Views: 349
कल्याण : दरवर्षी ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टी, पुरपरिस्थितीमुळे, वादळासारख्या आपत्तीमुळे जीवितहानी व वित्तहानीस सामोरे जावे लागते. या आपत्तीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची तुकडी केडीएमसी क्षेत्रात दाखल झाली असून त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत चर्चा करून येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या पावसाळ्याची सुरुवात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून झाली असून मागील एक, दोन दिवसापासून ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पूर प्रवणतेचा विचार करता पुरपरिस्थिती, इमारत दरड कोसळणे, वाहतूक कोंडी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीतीत आपत्तींना सामोरे जाण्यासाठी मान्सून कालावधी करीता, बचावकार्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संचालक यांच्यामार्फत ठाणे जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यापैकी २२ जवानांची एक टीम कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर व भिवंडीसाठी देण्यात आली आहे.
या एनडीआरएफच्या टिमचे पथक प्रमुख निरीक्षक राजेश यावले यांनी आपल्या टीमसह काल सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करुन कल्याण डोंबिवलीतील भौगोलिक परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. अतिवृष्टीच्या काळात दुर्गाडी परिसरात तसेच अंबिका नगर, शहाड या सखल परिसरात पाणी साचून लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय होते, यासाठी आज एनडीआरएफच्या पथकाने पथक प्रमुख निरीक्षक राजेश यावले, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक निकम यांच्या समवेत दुर्गाडी गणेश घाट परिसर, अंबिका नगर, शहाड या परिसराची पाहणी केली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची निर्देशानुसार एनडीआरएफच्या या पथकाच्या निवासाची व तद्अनुषंगिक व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली.



