Views: 481
कल्याण : १६ मे २०१६ रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन १२ जणांचा मृत्यू झाला होता तर दोनशे वर नागरिक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते. आज तिच पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होवून झाली आहे. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. तो अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही आणि त्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
आता पुन्हा तेच चौकशा समित्या नेमणार. प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमी होऊन जायबंदी झाले होते त्यांनाही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. आज झालेल्या स्फोटाने अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. इमारतींना स्फोटाचा वेळी मोठे हादरे बसले. एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. या भागात काही लोखंडी भागांचे अवशेष पडले आहेत. स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभयीत झाले असून असे काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एमआयडीसी मधील अती धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्यात याव्यात ही येथील जनतेची मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी सांगितले.



