Views: 407
५ रोलर्स, २०० सफाई कामगार, १५ पाण्याचे टँकर्स सह परिवहनच्या ५० बसेस पुरविणार…
कल्याण : सन २०२२ या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी खारघर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी अंदाजे १५ ते २० लाख एवढ्या मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संपन्न होणारा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी नजिकच्या परिक्षेत्रातील महापालिकांवर, शासकीय कार्यालयांवर व तेथील अधिकारी वर्गावर अनेकविध जबाबदा-या सोपविण्यात आलेल्या आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सापविण्यात आलेल्या जबाबदा-यांमध्ये ५ रोलर्स पुरविण्याची जबाबदारी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांचेवर सोपविण्यात आली असून, कार्यक्रम स्थळी २०० सफाई कामगार पुरविण्याची जबाबदारी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचेकडे देण्यात आली आहे. तर पाण्याचे १५ टँकर्स पुरविण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांना देण्यात आले असून, परिवहन उपक्रमाच्या ५० बसेस कार्यक्रम स्थळी उपलब्ध करुन देणेबाबत परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक दिपक सावंत यांना सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी १०० पोस्टर्स, बॅनर्स तयार करुन शहरातील विविध ठिकाणी प्रदर्शित करण्याचे काम मालमत्ता विभागाचे उपायुक्त वंदना गुळवे यांचेकडे दिले असून, महापालिकेतील समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त सुधाकर जगताप यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन चोखपणे होण्यासाठी महापालिकेच्या अधिका-यांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्या जातील याची दक्षता घेणेबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.



