महावितरणा समोर दुहेरी संकट

Views: 359
शेअर करा:

चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल; ६ लाख ६७ हजारांची वीजचोरी उघड

कल्याण : थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करून वीज मीटर काढल्यानंतरही वीजचोरी करणाऱ्या चार ग्राहकांविरुद्ध महावितरणच्या पथकाने कारवाई केली आहे. संबंधित चारही ग्राहकांवर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. वीजबिल थकबाकीचा वाढता डोंगर आणि वसुलीला मिळणारा थंड प्रतिसाद यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या महावितरणला आता अशा संकटांचा सामना करावा लागत आहे.

थकबाकीमुळे  सद्गुरू दत्ताराम म्हात्रे (त्रिमूर्ती सदन, कोपर गाव, डोंबिवली) या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढण्यात आले होते. महिनाभरानंतर महावितरणच्या पथकाने त्यांच्याकडे केलेल्या तपासणीत परस्पर व विनामीटर वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले. यांदर्भात सहायक अभियंता सुरेश लबडे यांच्या फिर्यादीवरून सद्गुरू म्हात्रे याने ४ हजार ९२० रुपये किंमतीची २९४ युनिट वीजचोरी केल्याचा गुन्हा कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. यापूर्वीही या ग्राहकाने वीजचोरी केल्याचे आढळले होते. चोरीच्या विजेचे १९२० रुपये व दंडाची रक्कम ४ हजार रुपये भरल्यानंतर जून २०२१ मध्ये या ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. 

कोन गाव परिसरात तीन ठिकाणी अशीच वीजचोरी उघडकीस आली आहे. आदिती ऐंटरप्रायजेस (राकेश तुळशीराम गुंजाळ, सर्वे क्र. १००/२, पाचमारनगर) या वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाने ४ लाख २ हजार ४८० रुपयांची १९ हजार २२८ युनिट वीजचोरी केल्याचे पथकाच्या तपासणीत उघडकीस आले. तर दत्तात्रय वेखंडे (वेल्डिंग वर्क्स, गाळा क्र. ५ व ६, सीताराम अपार्टर्मेंट) याने २ लाख २५ हजार ३०० रुपयांची १० हजार ३९२ युनिट तसेच राकेश तुळशीराम गुंजाळ (सुमित अपार्टमेंट, नाईकवाडी) याने ३४ हजार ७४० रुपयांची २ हजार ९ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. सहायक अभियंता अभिषेक द्विवेदी यांच्या फिर्यादीवरून तिन्ही ग्राहकांविरुद्ध भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात वीज चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनःर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. तर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीज वापरावर पथकांमार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत