कल्याण : प्लॅटफॉर्म वरून धावत्या लोकलमध्ये चढत असताना पाय घसरल्याने एक तरुण प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मध्ये अडकून जागीच मरण पावला. गुरुवारी डोंबिवली रेल्वे स्थानकात ही दुर्दैवी घटना घडली.
ओमकार नितीन बळे (२३) असे या तरुणाचे नाव असून डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्ता भागात हा तरुण राहत होता. ओमकारला कर्जत येथे जायचे होते. तो रेल्वे स्थानकात आल्यानंतर कर्जत लोकल येत असल्याची सूचना आली. सुचनेनंतर काही क्षणात लोकल सुटणार या विचाराने ओमकारने घाईने जिन्यावरुन उतरुन फलाटावर सुटणारी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत ओमकारचा पाय घसरला. तो लोकलच्या पायदान आणि प्लॅटफॉर्म यांच्या मध्ये अडकून जागीच मरण पावला. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.



