Views: 443
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने २७ गावातील जनतेवर १० पटीने अधिक लादलेल्या मालमत्ता कराविरोधात २७ गावातील नागरिक आक्रमक झाले असून सर्व पक्षिय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर २० एप्रिलला विराट धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत समितीच्या वतीने केडीएमसी आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सन १९८३ ला महापालिकेच्या स्थापनेपासूनच कल्याण डोंबिवली महानगरपालिका २७ गावातील जनतेवर वेगवेगळ्या मार्गाने अन्याय करीत आलेली आहे. या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटून त्याद्वारे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ गावातील समस्त जनतेद्वारे हे जनआंदोलन हाती घेण्यात आलेले आहे. हे धरणे आंदोलन २७ गावातील जनतेच्या मालमत्ता करामध्ये ह्या महापालिकेने १० पटीने अधिक वाढ केल्यामुळे तो कर रद्द करून पूर्ववत २०१५ च्या कर आकारणीनुसार आकारण्यात यावा ह्यासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. ह्या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने ह्या मालमत्ता कराच्या ज्वलंत प्रश्नाच्या सोडवणूकी बरोबरच २७ गावातील जनतेच्या काही ठळक मागण्या सुद्धा मान्य व्हाव्यात अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
२७ गावातील जनतेच्या मागणीनुसार २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका निर्माण करणे. २७ गावावर महापालिकेने लादलेला तब्बल १० पटीने अधिक वाढीचा मालमत्ता कर रद्द करून तो पूर्ववत ग्रामपंचायत दरानुसार आकारण्यात येऊन हाच कर पुढील २० वर्षापर्यंत कायम ठेवणे.२७ गावातील शेतकरी भूमिपुत्रांना नेस्तनाबूत करणारे बिल्डर धार्जिणे ग्रोथ सेंटर रद्द करणे. भाल व भोपर गावांवर अवास्तव आणि अन्यायाने आरक्षित केलेले डंपिंग ग्राऊंड रद्द करणे. २७ गावातील भूमिपुत्रांनी स्वतःसाठी गरजेपोटी केलेली सर्व बांधकामे नियमित करणे. २७ गावातील जनतेच्या सोयीसुविधांसाठी भरीव आर्थिक तरतूद करणे यासह इतर मागण्या समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.



