Views: 469
कल्याण : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील कल्याण मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे इनकमिंग आउटगोइंग सुरु झाले होते. काही महिन्यांचा कालावधी जाता हे स्थिरावले होते. मात्र कल्याणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे ते पुन्हा सुरु झाले का ? अशी चर्चा होत आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील कल्याण उपजिल्हाप्रमुख, ज्येष्ठ तथा जुने जाणकार शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक, मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व अशी ओळख असलेले अरविंद मोरे यांनी आपल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी अरविंद मोरे यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. मोरे यांच्या सोबतच माजी शिक्षण मंडळ सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष डॉ जितेंद्र भामरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस राजीव कपोते, युवा सेनेचे विष्णू लोहकरे, दिनेश निचीत, सुजय कदम या सर्वांना भगवा झेंडा हाती देऊन एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवेश दिला.
या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कल्याण मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक मोहन उगले, जयवंत भोईर, श्रेयस समेळ, छाया वाघमारे, संजय पाटील, नेत्राताई उगले, मयूर पाटील, गोरख जाधव, अंकुश जोगदंड, अभिषेक मोरे आणि इतर नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.



