Views: 462
कल्याण : कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत पालिकेच्या आडमुठय़ा धोरणाचा या रस्ता बंधितांनी कल्याण पूर्वेतील गणपती चौक ते जे वार्ड पर्यंत निषेध मोर्चा काढला.
बाधित होणार्या शेकडो नागरिकांना वैयक्तीक सुनावणीची नोटीस मिळाली नाही. ज्यांना मिळाल्या त्या उशिरा मिळाल्यात. पालिकेच्या अचानक आवाहनानंतर लोक उत्स्फूर्त उपस्थित राहत आहेत. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 210 नुसार पालिका रस्त्याची विहित रूपरेषा नव्याने आखू शकले असते परंतु यामध्ये कलम 211 नुसार या विहित केलेल्या रेषेनुसार इमारती मागे हटवण्याचे अधिकार जसे पालिकेला प्राप्त होतात त्याचप्रमाणे कलम 212 प्रमाणे पालिकेस बाधित नागरिकांना पुनर्वसन देणेही आवश्यक ठरते. परंतू घाई घाईने काढलेल्या सूचनेनुसार आणि सुनावणी नुसार पालिका पुनर्वसनाची जबाबदारी पाळत नाही.
पालिकेने पुनर्वसनाची योजना दिलेली नाही. 1600 ते 1800 लोकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पालिका कशी पार पाडणार हे कळविले नाही. सीमांकन योग्य न झाल्याने बाधितांचे जास्त नुकसान होणार आहे काही ठिकाणी सीमांकन झालेले नाही. सुनावणीच्या वैयक्तीक नोटीस मिळाली नाही. मिळाली त्यांना उशिरा देण्यात आल्या आहेत. सुनावणीस कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. परंतु कोणकोणते कागदपत्र असावे हे नमूद नाही. त्यामुळे नागरिकांनी सुनावणी करिता मुदतवाढ मिळावी, तसेच योग्य प्रक्रिया राबवली जावी, अशी मागणी केली आहे. आमचे पुनर्वसन आहे तिथेच करावे. अन्यथा महापालिकेकडे आरक्षित असलेल्या मिळकतीत पुनर्वसन मोबदला म्हणुन करावे अशी पालिके कडे मागणी केली आहे.
तसेच महापालिका सभा क्र.20 मध्ये 193 क्रमांकाचा ठराव मंजूर आहे ज्यात स्पष्ट ठराव करण्यात आला की आधी पुनर्वसन धोरण, योजना याचा सर्वकश आराखडा असल्याशिवाय यू टाईप रस्ता रुंदीकरण प्रक्रिया राबवू नये. त्यात ज्या सक्षम अधिकारी स्वाक्षरीने सुनावणीचे आवाहन केले होते त्या सहाय्य संचालक नगररचना अधिकारी सुनावणीस उपस्थित नव्हत्या. जे अधिकारी उपस्थित होते त्यांना प्राधिकृत केलेले नव्हते या मुद्यावरून त्यांना घेराव घातला असता ते म्हणाले मी सुनावणी साठी नाही आलो. सुनावणी घेत नाही तुमची जी हरकत असेल ती नोंदवा.
अखेर त्यांना उपस्थित राहिलेल्या 500 लोकांनी सह्या सहित निवेदन दिले. सर्व मुद्दे मांडून, सुनावणी करिता मुदत वाढ द्यावी असे सांगितले. महापालिकेच्या अशा भोंगळ कारभाराचा निषेध करीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली असल्याची माहिती पुनर्वसन कृती समिती चे अध्यक्ष माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी दिली.



