Views: 671
कल्याण : जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेली व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी गोवेली महाविद्यालयात एकदिवसीय दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी व तरूणांनी या शिबीराचा लाभ घेतला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना व तरुणांना आवश्यक दाखले सहज आणि सुलभ रितीने मिळावेत यासाठी जीवनदीप महाविद्यालयात दाखले वाटप शिबीराचे आयोजन केले गेले. मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जीवनदीप स़स्थचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबीरात उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, जेष्ट नागरिकांचा दाखला व स्थानिक वास्तव्याचा दाखला आदी दाखले देण्यात आले. कल्याण ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी व तरूणांनी शिबीरास उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या शिबीरात एकूण ५३७ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालयीचे प्राचार्य रोहणे व शिक्षकवर्ग यांनी नियोजन करून शिबीर यशस्वीपणे पार पाडले. या शिबीराचे आयोजन करून दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आमदार किसन कथोरे, रवींद्र घोडविंदे व तहसीलदारांचे आभार मानले.


