Views: 566
भाजपाच्या पाठिंब्याने आंबेडकरी, मुस्लिम मते विभागण्यासाठी निवडणूक लढत असल्याचा आरोप
कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच भिवंडी लोकसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सोबतचा फोटो विरोधकांनी सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल केला आहे. भाजपाच्या पाठिंब्याने बौद्ध, आंबेडकरी, मुस्लिम मते विभागण्यासाठी निवडणूक लढत असल्याचा आरोप सांबरे यांच्यावर करण्यात आला आहे.
भिवंडी लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान होणार असून भिवंडी लोकसभा मतदार संघात सलग दोनवेळा निवडून आलेल्या पंचायत राज्य मंत्री भाजपाचे कपिल पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या मध्ये तिरंगी लढत होत आहे. हे तिघे उमेदवार कोट्याधीश असून या निवडणूकीत आपणच निवडून येणार असा दावा करीत आहेत. असे असले तरी या मतदारसंघात भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापुर असे सहा विधानसभा क्षेत्र मोडत आहेत.
अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यामुळे युती आघाडीची गणिते बिघडण्याची शक्यता असून अशातच निलेश सांबरे यांचा संभाजी भिडे यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून याची राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.
भीमा कोरेगाव घटनेचे षडयंत्र रचणाऱ्या संभाजी भिडे यांच्या समर्थकांस आंबेडकरी मतदार कधीच मतदान करणार नाही. नीलेश सांबरे यांनी आजपर्यंत भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या बद्दल एकही शब्द उच्चारला नाही. आरएसएस भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने फक्त बौद्ध, आंबेडकरी आणि मुस्लिम मते कुजविण्यासाठी नीलेश सांबरे अपक्ष म्हणून लढत आहेत. त्याचबरोबर सांबरे यांनी दोन अर्ज भरले होते, एक अपक्ष आणि एक कॉँग्रेसच्या वतीने. महाविकास आघाडीने उमेदवार दिला असतांना देखील केवळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोप सोशल मिडियावर करण्यात आला आहे. तर गंगाधर हि शक्तिमान है, मतदान करतांना विचार करा अशा पोस्ट सोशल मिडियावर वायरल करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे संभाजी भिडे यांच्यासोबतचा फोटो हा नीलेश सांबरे यांना डोकेदुखी ठरत असून याचा त्यांना कितपत फटका पडतो किंवा फायदा होतो हे आगामी काळात कळेलच. तर याबाबत सांबरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तर त्यांच्या प्रतिनिधींना याबाबत विचारले असता संपर्क होऊ शकला नाही.



