Views: 591
कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील कर थकबाकीदारांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पुन्हा एकदा अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्याच्या १५ जूनपासून या योजनेला प्रारंभ होणार असून या अभय योजनेद्वारे २०० ते २५० कोटींची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होण्याचा विश्वास आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला महापालिका सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे उपस्थित होते.
कोवीड काळात आणि त्यानंतर केडीएमसी प्रशासनाने लागू केलेल्या या अभय योजनेला थकबाकीदार आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या पार्श्वभुमीवर ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार पुढील महिन्यापासून ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. या योजनेअंतर्गत पाणीपट्टी तसेच मालमत्तेच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेत ७५ टक्के सूट (संपूर्ण थकाबकी एकरकमी भरल्यास) देण्यात येणार आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीसाठी ही योजना लागू राहील.
दरम्यान केडीएमसी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत थकीत कराची रक्कम तब्बल १ हजार ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये व्यावसायिक मालमत्ता कराची थकबाकी सर्वाधिक आहे. त्यापैकी बरीचशी प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्याच्या वसुलीत अडथळा ठरत असल्याचे सांगत या अभय योजनेद्वारे २०० ते २५० कोटींची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होण्याचा विश्वास आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी व्यक्त केला.



