कल्याण : कल्याण डोंबिवली महानरपालिकेच्या स्मार्ट-सिटी प्रकल्प अंतर्गत स्टेशन परिसरात काम सुरू आहे. मात्र पालिकेचा रितसर परवाना व वाहतूक शाखेचा ही रितसर ना हरकत घेऊन गेली अनेक वर्ष आपला परंपरागत गटई व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गटई कामगारांना त्यांचे गटई स्टॉल त्वरित हटवावेत असे तोंडी आदेश देऊन कारवाही करण्याचे ही सांगितले आहेत. त्यामुळे याच्या निषेधार्थ कल्याणमधील गटई कामगारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
मुळात गटई कामगार हा फेरीवाला नाही असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही स्मार्ट सिटीच्या नावाने आपली रोजीरोटी हिस्कवली जात असल्याने गटई कामगारांचा आक्रोश सुरू आहे. त्यामुळे जर न्याय मिळाला नाही तर सामुदायिक आत्मदहन करावे लागेल असा संताप व्यक्त होऊ लागला आहे अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष राम बनसोडे, कल्याण शहर अध्यक्ष रुपेश भोईर यांनी व्यक्त केली आहे.
तसेच स्मार्ट सिटीच्या कामाला आमचा मुळीच विरोध नसून गटई कामगारांच्या रोजी रोटी साठी समस्त चर्मकार समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असेही सांगितले. यावेळी केडीएमसी आयुक्त व क प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना हा तोंडी आदेश रद्द व्हावा या करिता रीतसर निवेदन देण्यात आले. यावेळी भैरवनाथ वाघमारे, गजेंद्र राऊत, कल्याण गायकवाड, सोमनाथ राऊत, हनुमंत गायकवाड, संजय वाघमारे, रामानंद बोबणे, बाळासाहेब वाघमारे, दिलीप वाघमारे, संदीप वाळंज, धुरजी इंगळे, रामचंद्र राऊत, गुरुनाथ भोईर आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



