Views: 474
निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन
कल्याण : नुकत्याच कल्याण लोकसभा मतदार संघ परिक्षेत्रात संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी 4 जुन रोजी डोंबिवली (पूर्व) येथे वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात संपन्न होत आहे. या मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण मंगळवारी सावित्रीबाई फुले कला मंदिरात घेण्यात आले.
मतमोजणी केंद्रातील प्रवेशाचे स्थान यापासून मतमोजणी केंद्राची रचना, मतमोजणी टेबलांची रचना, पोस्टल बॅलेटची मतमोजणी व इतर मतमोजणी प्रक्रियेबाबत, उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गास कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी अत्यंत ओघवत्या व सुलभ शब्दात तसेच प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देवून मार्गदर्शन केले.
मतमोजणीच्या दिवशी सकाळी 7 वाजता सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी केंद्रात स्थानापन्न व्हावे, तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई आहे. अशा सुचनाही कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी यावेळी दिल्या. यावेळी कल्याण लोकसभा मतदार संघातील पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते आणि सहाही विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.



