कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी वाढणार…

Views: 470
शेअर करा:

कल्याण बस स्थानाकात केडीएमटी व एनएमएमटी प्रवेश बंदी

निलम चौधरी

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गात सुरु असलेल्या विकासकामांमुळे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी महामंडळाने केडीएमटी व एनएमएमटी च्या बसेसला एसटी डेपो मध्ये प्रवेश बंदी घातल्याने या बसेस उभ्या कुठे करायचा हा मोठा प्रश्न केडीएमटीच्या समोर निर्माण होणार असून ? तसेच या बसेस आता एसटी डेपो बाहेर उभ्या राहिल्या तर वाहतूक कोंडीत अधिक भर पडेल ! अशा चर्चेला उधाण आले आहे.   

कल्याण रेल्वे स्टेशन परिसराला लागुनच एकीकडे एसटी बस डेपो आहे तर दुसरीकडे जिल्हा सत्र न्यायालय आणि तहसील कार्यलय आहे. तर यांना लागुनच पुढे ग्रामपंचायत आणि शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी होत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेचे  स्मार्ट सिटी अंतर्गत विकासप्रकाल्पाचे काम सुरु आहे. या कामामुळे गेली अनेक महिने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. या स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाची साधनसामग्री ही कल्याण बस डेपो परिसरात विकासकाकडुन ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर बसस्थानकामध्ये बसेस पार्किंग व प्रवाशांची गैरसोय झालेली आहे. सदर प्रकल्पाचे काम सुरु असल्याने बसस्थानक परिसरात वाहतुक कोंडी होत आहे. सदर वाहतुक कोंडी कमी व्हावी याकरिता कल्याण आगारामध्ये मुक्कामी असणाऱ्या इतर विभागाच्या ५० बसेस विठठलवाडी आणि भिवंडी या आगारामध्ये विस्तारित करण्यात आलेल्या आहेत. परंतु केडीएमटी व एनएमएमटी उपक्रमांस कल्याण आगार बसस्थानकात वाहतुक करण्यास बंदी असताना ही सदर बसेस सर्रासपणे बसस्थानकांमधुन वाहतुक करत आहेत. सदर उपक्रमाकडुन वाहतुक कोंडीबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. परिणामी एस. टी. बसेस वाहतुक कोंडीमध्ये अडकुन फेऱ्या वेळेत न सुटल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये भविष्यात मोठी दुर्घटना घडु नये तसेच रा. प. मालमत्तेस कोणतीही हानी होऊ नये याकरिता रा. प. महामंडळाकडुन विभाग नियंत्रक, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली रा.प. कल्याण आगार येथे सोमवार १० ओक्टोंबर २०२२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस रा.प. महामंडळ ठाणे विभागाचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा कल्याण केडीएमटी व एनएमएमटी उपक्रमाचे अधिकारी स्मार्टसिटी प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये स्मार्टसिटी प्रकल्पामुळे बसस्थानक परिसरात होणारी वाहतुक कोंडी यावर चर्चा करून तोडगा काढणेबाबत विभाग नियंत्रक, ठाणे यांचेकडुन सुचविण्यात आले. त्यानुसार १५ ओक्टोंबर पासुन केडीएमटी व एनएमएमटी उपक्रमाच्या बसेसना रा.प. कल्याण बसस्थानकाच्या हददीतुन वाहतुक बंद करणेबाबत ठरवण्यात आले आहे.

वहातुक कोंडी आणि केडीएमटी व एनएमएमटी बसेसला डेपोमध्ये प्रवेश बंदी करून पर्याय व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी वाहतूक विभाग, आरटीओ, केडीएमटी आणि कल्याण डेपो व्यवस्थापक यांच्या प्रतिनिधींसह बैठक पार पडली. कल्याण डेपोमध्ये एसटी महामंडळा व्यतिरिक्त इतर गाड्यांच्या २५० ते ३०० फेऱ्या होतात. एसटी डेपो समोर विकास प्रकल्प सुरु असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. पुढे स्मार्ट सिटी अंतर्गत एसटी डेपोची इमारत पाडण्यात येऊन नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जागा पत्रे लाऊन बंद करण्यात येयील. एसटी डेपो मधून वाहतूक करणाऱ्या प्रवाश्यांना उर्वरित जागेत बसण्यासाठी पर्याय व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच जागा कमी होणार आहे. त्यामुळे बैठक घेऊन १५ तारखे पर्यंत केडीएमटी व एनएमएमटीला मुदत देण्यात आली आहे. एसटी डेपोमध्ये बस उभी करणे अथवा प्रवाश्यांसाठी उभे करण्यासाठी केडीएमटी व एनएमएमटी यांच्याशी करार झालेला नाही. तर फक्त श्री मलंगगड येथे जाणाऱ्या काही गाड्यांसाठी डेपोकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्वच गाड्या येत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती कल्याण एसटी डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा आणि नागरिक आणि प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी बैठक घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

कल्याण बस डेपो स्थानकात केडीएमटीच्या बसेसला प्रवेश बंदी केल्याची माहिती मिळाली असून याबाबत कल्याण बस डेपो व्यवस्थापक यांच्याशी बोलणार असल्याचे केडीएमटीचे व्यवस्थापक दिपक सावंत यांनी सांगितले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत