Views: 435
भाजपा जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांची टीका
कल्याण : केबल व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दबावतंत्राचे राजकारण केलं जातंय, मुळात स्वतः चौकशी करा भाजपच्या पदाधिकाऱ्याला नाहक बदनाम करु नका अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पत्रकार परिषदेत केली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी संदीप माळी यांना अटक करण्याची मागणी केली होती त्यानंतर आज भाजपा जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपा पदाधिकारी नंदू परब, नंदू जोशी, संदीप माळी यांचे भाऊ अमर माळी आदी जण उपस्थित होते.
कल्याण ग्रामीण संदप गावात राहणारे केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांनी ट्रेन खाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडियो तयार केला होता. या व्हिडीओत व्यवसायात त्यांना त्रास दिला जात आहे असं सांगितलं होतं. या प्रकरणी भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांच्यासह १५ जणांविरोधात ठाणे जिआरपी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत संदीप माळी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
भाजपच्या नेत्यांचे संदीप माळी यांना पाठबळ असल्याचा देखील आरोप तपासे यांनी केला होता. त्यानंतर आता भाजपने देखील राष्ट्रवादी विरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. संदीप माळी यांचा त्या प्रकरणात काही संबंध नाही. राजकीय षड्यंत्रातूनच त्याचं नाव या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी. राष्ट्रवादी कडून जे आंदोलने केली जातात ती राजकीय हेतूपोटी केली जातात. राष्ट्रवादीने एखादे आंदोलन करण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करावी उगाच कोणत्या व्यक्ती पार्टी आणि परिवाराला नाहक बदनाम करू नये. तसेच या प्रकरणाचे राजकीय भांडवल करू नये असा इशारा कांबळे यांनी यावेळी दिला.



