Views: 473कल्याण : खासदार संजय राऊत यांची जामिनीवर मुक्तता झाल्याने कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना उध्दव ठकारे गटाने जल्लोष करीत परिसर दणाणून टाकला. गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये असणाऱ्या खासदार संजय राऊत यांची बुधवारी कोर्टाने जामिनावर मुक्तता केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुंबईसह ठिकठिकाणी आनंदोत्सव सुरू झाला आहे. कल्याणातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
पत्रा चाळप्रकरणी ईडीकडून अटक झालेले शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत गेल्या १०० दिवसांपासून जेलमध्ये होते. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने संजय राऊत यांना दुपारी जामीन मंजूर केला. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दुपारपासून आनद साजरा करण्यास सुरुवात केली. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत हे जेलमधून बाहेर आल्यानंतर सगळीकडेच जल्लोष सुरू झाला आहे.
कल्याणातही तेच चित्र दिसून आले. शिवसेना जिंदाबाद, पन्नास खोके, कोण आला रे कोण आला आदी घोषणांच्या गजरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अल्ताफ शेख, कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास, रवी कपोते, रमेश जाधव, अनिल डेरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



