Views: 438
कल्याणकरांनी अनुभवला “शून्य सावली दिवस”
कल्याण : सुभेदारवाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “शून्य सावली दिवस” या खगोलीय घटनेचे निरीक्षण करण्यासाठी कल्याणमधील सुभाष मैदान येथे शनिवारी दुपारी १२:३० च्या सुमारास एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आकाश मित्र मंडळाचे सदस्य आणि खगोल अभ्यासक विद्येश कुलकर्णी यांनी शून्य सावली दिवस म्हणजे काय, तो केव्हा येतो, का येतो, शून्य सावली क्षण केव्हा असतो, जगातील कुठल्या भागतून तो अनुभवता येतो याची माहिती सोप्या शब्दांत सांगितली.
त्याचबरोबर सूर्याची क्रांती, उत्तरायण – दक्षिणायन, कर्क वृत्त आणि मकर वृत्त, संपात दिन, सूर्याचा भासमान मार्ग म्हणजेच आयनिक वृत्त, वेलांतर अशा खगोलीय संकल्पना देखील समजावून सांगितल्या. सूर्य रोज दुपारी बारा वाजता आपल्या डोक्यावर येतो असं बोली भाषेत आपण म्हणत असलो तरी सूर्य डोक्यावर म्हणजेच “झेनिथ” वर येणे म्हणजे काय आणि ते केव्हा होऊ शकतं तसेच प्रत्येक गावी दुपारी बारा वाजता माध्यान्ह होत नसून ती रेखांशाप्रमाणे कशी बदलते याची माहिती दिल्यावर उपस्थितांना विज्ञानाची किमया जाणून घेता आली.
त्याचबरोबर उपस्थितांना वर्तुळात उभं करून सावली पाहणं तसेच काचेवर पाईप ठेवून त्याची सावली बरोबर त्याच्या खाली कशी पडते ते दाखवणं असे सोपे प्रयोग देखील करण्यात आले. शून्य सावली या अद्भुत क्षणाच्या निरीक्षणाचा लाभ विद्यार्थींनी, लहान मुलांनी आणि नागरिकांनी घेतला. विद्यार्थ्यांनी कुतुहलात्मक प्रश्न विचारले त्यावर त्यांना समजेल, अशा सोप्या भाषेत उत्तरं देण्यात आली.
ज्येष्ठ खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुभेदारवाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळाचे संजय पांडे यांनी संस्थेच्या खगोलशास्त्रातील वाटचालीची उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमास सुभेदारदार वाडा कट्टा, आकाश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थी, खगोलप्रेमी नागरिक उपस्थित होते.



