Views: 392
कल्याण : मराठी भाषेचे अस्तित्व उरले नाही, मराठीत नवं साहित्य निर्मिती होत नाही अशी आणि अश्या विविध स्वरूपाची वाक्य कानी पडत असताना मराठी जोपासावी आणि साहित्य नवनिर्मितीस हातभार लाभावा या करीता विविध उपक्रमांद्वारे नावाजलेल्या साहित्यसंपदातर्फे मराठी भाषा पंधरवडा नाविन्यपूर्ण संकल्पनेने साजरा होणार आहे.
२०२२ हे वर्ष साहित्यसंपदातर्फे “मराठी साहित्य अभ्यास वर्ष ” म्हणून साजरे होत असताना संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी विविध उपक्रमांची घोषणा मराठी भाषा पंधरवडा निमित्त नुकतीच केली. त्या अंतर्गत पहिली कविता लेखन आणि सादरीकरण कार्यशाळा मराठी भाषा पंधरवड्या दरम्यान पार पडणार आहे. सदर कार्यशाळेस जेष्ठ कवी गीतकार राजन लाखे ह्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मराठी भाषा पंधरवड्या अंतर्गत निमंत्रितांचे काव्यसंमेलन, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या आणि मराठी भाषेतून शिक्षण घेऊन समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.
मराठी भाषेचा गोडवा पुढील पिढ्यांत टिकून राहण्यासाठी “वाचन शंभरी ” ह्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग १०० दिवस विविध विषयांवरील लेख कविता आणि इतर साहित्याचे वाचन ह्या उप्रक्रमाद्वारे पार पडणार असून महाराष्ट्रातील विविध शाळा आणि महाविद्यालये ह्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. १४ आठवड्यांचा वाचन उपक्रम तीन गटांमध्ये विभागला गेला आहे. गट १- बालवाडी ते इयत्ता दुसरी,गट २- इयत्ता तिसरी ते पाचवी, गट ३- इयत्त्ता सहावी ते आठवी. शिक्षकरत्न पुरस्कार विजेते हनुमंत देशमुख यांनी उपक्रमाची सुरवात करताना सफदर हाश्मी यांच्या ‘ किताबें करती हैं बातें’ या कवितेच्या दासू वैद्य यांनी मराठीत केलेल्या भाषांतरित कवितेचे वाचन केले. ज्ञानामृत विद्यालय, अंबरनाथ ह्यांचे संस्थापक किसन अमृत वराडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर उपक्रमाची सुरवात झाली.
तळागाळातील मागासलेल्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून सुरू केलेली शिक्षणसंस्था आज समाजात आपले विशेष स्थान निर्माण करत असताना आजपर्यंतच्या खडतर प्रवासाची ओळख त्यांनी उपस्थितांना करून दिली करून दिली. “सरवा” ह्या त्यांच्या आत्मचरित्राचे वाचन क्रमशः पद्धतीने वाचन आपण करणार असून ,मराठी शाळांसाठी काम करू पाहणाऱ्या व्यक्तींना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी माहिती कुंदा झोपे ह्यांनी दिली. अस्मिता सावंत, नूतन ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय -कल्याण पूर्व हयांनी सावित्रीबाई फुले ह्यांना मानवंदना वाहून वाचन शंभरी उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
फक्त शाळाच नाही तर विविध खाजगी शिकवणी वर्ग, विविध साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक संस्था सुद्धा सदर उपक्रमात सहभाग घेऊन मराठी भाषा पंधरवडा साहित्यसंपदासंगे साजरा करून मराठी वाचन संस्कृतीची मुळे खोलवकर रुजावीत ह्यासाठी आपले योगदान देऊ शकतात असे आवाहन समन्वयक सलोनी बोरकर आणि वंदना मत्रे ह्यांनी करताना सहभागासाठी ९०२९६८७४८३ ह्या क्रमांकावर संपर्क करावा असे सांगितले.



