Views: 486
कल्याण : गेल्या वर्षी झालेल्या सर्व्हेच्या अहावला नुसार दररोज आपल्या देशात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे ७५ ते ८० गुन्हे दाखल केले जातात. यावर मात करण्यासाठी आता युवतींना व स्त्रीयांना स्वतः सक्षम होऊन कोणत्याही परिस्थतीमध्ये स्वतःचा बचाव करता येणे आवश्यक आहे. याच परिस्थितीवर मात करण्यासाठी मिशन प्रहार नावाची संकल्पना उदयास आली ज्या अंतर्गत प्रत्येक शाळा, महाविद्यालये, बँक, सोसायटी, कंपन्या, महिला मंडळ अशा विविध ठिकाणी जाऊन महिलांना आत्मसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सिद्धिविनायक युवा संस्था संचलित विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन या क्रीडा अकादमीच्या वतीने बंट्स संघा शिक्षण मंडळ संचालित अण्णा लीला महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम शिकत असलेल्या ११० महाविद्यालयीन युवतींसाठी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोनचे क्रीडा प्रशिक्षक व जिल्हा युवा पुरस्कार विजेते हरीष वायदंडे यांनी आपल्या प्रभावशाली वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून मार्गदर्शन करून उपस्थित सर्व युवतींचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास द्विगुणित केला.
त्याचप्रमाणे महिला प्रशिक्षिका हर्षदा पाडेकर, हर्षाली मालप, सिद्धी जाधव आणि प्रतीक्षा लांडगे यांनी सर्व उपस्थित युवतींना समाजात महिलांसोबत पडणाऱ्या वाईट कृत्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या खूप लहान लहान व अतिशय महत्त्वाच्या युक्त्या शिकवून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. अनेक युवतींना स्वतःचा बचाव करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या युक्तीबाबत असणाऱ्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अण्णा लीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, महिला विकास समितीच्या प्रमुख डॉ. अंचल जैन, अंतर्गत तक्रार समिती प्रमुख विद्या दर्वेश व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. मनोज वर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



