Views: 384
कल्याण : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी सर्वांनी सहभाग घेतला तर नक्कीच कल्याण डोंबिवली नगरी सुंदर व स्वच्छ करू शकू असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात महापालिका अधिकारी वर्ग, विविध सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, पोलीस अधिकारी यांचे समवेत शहर सौंदर्यीकरणाबाबत आयोजिलेल्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. दांगडे यांनी हे आवाहन केले.
१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत शासनाने “शहर सौंदर्यीकरण” स्पर्धा आयोजित केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील यात सहभाग घेतला आहे आणि त्यानुसार उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचप्रमाणे यामध्ये लोक सहभाग घेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. शहर सौंदर्यीकरणामध्ये करावयाच्या कामांची आम्ही वर्गवारी केली असून काही संस्थांनी यामध्ये सहभाग घेण्याबाबत आश्वासित केले असल्याची माहिती यावेळी पत्रकारांशी बोलताना दांगडे यांनी दिली.
महानगरपालिकेसाठी नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांच्या सूचनांचा शहर सौंदर्यीकरणासाठी आम्ही नक्कीच विचार करू तरी यामध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांनी पुढे यावे आणि आपल्या प्रस्तावांसाठी ce.kdmc@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करावा अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी या बैठकीत दिली.
यापूर्वी रस्त्यावरील दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी काही संस्थांनी महापालिकेस सहकार्य दिले आहे असाच हातभार इतर संस्थांनी लावल्यास शहर सौंदर्यीकरणास मदत होईल असे आवाहन महापालिका सचिव संजय जाधव यांनी या बैठकीत केले. शहराच्या सौंदर्यीकरणात सर्वच घटकांनी सहभाग घ्यावा आणि आपले शहर कसे चांगले होईल याबाबत विचार करावा असे मत घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी या बैठकीत मांडले.
या बैठकीस महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिकेचे सर्व उपायुक्त, महापालिका सचिव, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, महापालिकेचे कार्यकारी अभियंता, सहा.आयुक्त, इतर अधिकारी वर्ग,सहयोग संस्थेचे विजय भोसले, गणेश मंदिर संस्थानचे राहुल दामले, वाहतूक शाखेचे महेश तरडे, सोलेस इंडियाच्या डॉ. रूपींदर कौर, रोटरीच्या विविध संस्थांचे पदाधिकारी अनेक विकासक तसेच इतर अनेक एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहर सौंदर्यकरणासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीस अनेक एनजीओ व इतर संस्थांच्या प्रतिनिधींनी बहुसंख्येने उपस्थित राहून महापालिकेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि महापालिकेच्या हातात हात घालून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी तयारी दर्शविली.



