Views: 403
पालकमंत्र्याच्या इतिवुत्तानुसार अमंलबजावणी करण्याची केली मागणी
कल्याण : रिंगरोड मध्ये दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान अटाळी आंबिवली येथील शेकडो घरे बाधित होत असून या बाधितांच्या पुनर्वसनाबाबत सदनिका धारकांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला तसेच या प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे साकडे घातले होते.
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी १८ आँक्टोबर २०२२ झालेल्या बैठकीच्या इतिवुत्तानुसार त्यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा – अटाळी – आंबिवली या विभागातील बाधित होणाऱ्या ८४५ कुटुबियांचे पुनवर्सन करण्याकरिता, ठाणे महानगरपालिका प्रमाणे पुनवर्सन धोरणाचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून पुनर्वसन धोरणाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर उचित कार्यवाही करणे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा – अटाळी- आंबिवली या विभागातील रिंग रुटमध्ये बाधित होणाऱ्या ८४५ कुटुंबायांनी संयुक्त मोजणीस सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याअनुषंगाने बुधवारी अटाळी आंबिवली रिंग रूट बाधित सदनिका धारकांच्या शिष्टमंडळाने बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या समवेत कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. आयुक्तांनी आचार संहिता कालावधी संपल्यावर याबाबतचे धोरण स्पष्ट होईल असे सांगितले असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
तर याबाबत आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याशी संपर्क साधला असता, कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर याबाबत धोरण स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.



