Views: 532
कल्याण : संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत निरंकारी सत्संग भवन ठाणे येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये १७० निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन मानवसेवेच्या भावनेचा परिचय दिला.
‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या संदेशाला कृतीत उतरवत आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने १३६ यूनिट तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय रक्तपेढीने ३४ रक्त युनिट संकलित केले.
शिबीराचे उदघाटन संत निरंकारी मंडळाचे गोरेगाव येथील सेक्टर संयोजक शंभूनाथ तिवारी यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अनेक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात आमदार ॲड. निरंजन डावखरे, बदलापुर नगरपालिका मुख्याधिकारी योगेश गोडसे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे (ठाणे) कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, मालती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रक्तदान शिबीराचे आयोजन पाहून निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले.
संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक डॉ. आर. एस. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रबंधक, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे प्रतिनिधी व सेवादल स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
त्याचप्रमाणे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने याच दिवशी संत निरंकारी सत्संग भवन चेंबूर येथे आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात ३९१ नागरिक लाभान्वित झाले.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानव सेवा हीच ईश्वर पूजा या शिकवणीला अनुसरुन नेत्र समस्यांनी ग्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू नागरिकांची मोफत नेत्रचिकित्सा करण्यात आली. गरजेनुसार त्यांना औषधे देण्यात आली तसेच ज्यांना मोतीबिंदु आढळून आले त्यांच्या मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली. १२० नेत्ररुग्णांच्या चष्म्यांचे नंबर काढून त्यांना चष्मेही वितरित करण्यात आले.
या शिबिरात ३८ रुग्णांना मोतीबिंदु असल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांची मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना के.बी.हाजी बच्चुअली चॅरिटेबल हॉस्पिटलला संदर्भित करण्यात आले. नॅशनल असोसिएशन फार ब्लाईंड आणि पोदार हॉस्पिटल, मुंबई यांच्या डॉक्टरांनी नेत्रचिकित्सा करण्यासाठी आपले योगदान दिले.
संत निरंकारी मंडळाच्या समाज कल्याण विभागाच्या प्रेमा ओबेरॉय यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक विजय विचारे तसेच मोहन गुंडू यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि संत निरंकारी सेवादलाच्या स्वयंसेवकांनी या शिबिरात बहुमूल्य योगदान दिले.



