Views: 541
कल्याणच्या विविध प्रश्नांसाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट
कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत मागणी केली आहे.
त्यावेळी कल्याण पश्चिमच्या विकासाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यामध्ये कल्याण – भिवंडी – ठाणे मेट्रोचे काम तातडीने सुरू करण्या संदर्भातचे पत्र दिले आहे. २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सुरू झालेल्या प्रकल्पाला ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे, त्यावरची स्थगिती उठवून कल्याण – भिवंडी – ठाणे मेट्रोचे काम सुरू करावे ही मागणी केली आहे. तसेच कल्याण पश्चिममधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळील डॉ. आनंदीबाई जोशी उद्यान विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. डॉ. आनंदीबाई जोशी या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या, त्यांचा कर्तृत्ववान इतिहास जपण्यासाठी निधी दिल्यास कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे.
कल्याण पश्चिममधील रुक्मिणीबाई रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे मागणी केली. कल्याण पश्चिममध्ये असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र प्रशासकीय अधिकारी यांची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळण्यास अडथळा येतो, त्या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला तर सर्व सेवासुविधा मिळतील आणि रुग्णांना मदत होईल यासाठी ही मागणी केली असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना सांगितले.
या तिन्ही विषय तातडीने मार्गी लावणार असून विविध यासह सर्वच बाबतीत सदैव सहकार्य करणार असून, कल्याणच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वस्त केले असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी भेटीनंतर व्यक्त केले.



