Views: 465
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील एसटी डेपो समोरील रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड पुन्हा सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कल्याण पश्चिमेतील एक नंबर प्लटफॉर्मच्या बाहेर 1980 पासून जे रिक्षा स्टँड होते ते रिक्षा स्टॅण्ड कोरोना काळात सरकारी आदेशाचे पालन करत रिक्षा चालक मालक घरात होते. या गोष्टिचा फायदा रेल्वे प्रशासनाने घेत रिक्षा चालक मालक यांना रिक्षा लावण्यास बंदी घातली. रिक्षा चालक मालक यांना रेल्वे प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आपल्या मर्जीने रिक्षा चालक मालक यांना रिक्षा लावण्याची बंदी घातली असून रिक्षा चालकांना रस्त्यावर आपली वाहने उभे करत व्यवसाय करावा लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून याचा प्रवाशांना देखील त्रास होत आहे. याबाबत कल्याण शहर येथील रिक्षा चालक मालक यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायतकडे या रिक्षा स्टॅण्डवर पुन्हा रिक्षा लावण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव शिवाजी गोरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष देशपांडे, कल्याण शहर अध्यक्ष मनोज गोसावी, आरटीओ प्रतिनिधी मिथुन जाधव आदींनी रिक्षा चालक मालक यांच्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. त्याचप्रमाणे आमदार विश्वनाथ भोईर यांची देखील भेट घेऊन याबाबत रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालत मुद्दा निकाली लावण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले असून आमदारांनी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.



