Views: 596
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त २ जून ते ५ जून या कालावधीत पर्यावरण महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ, श्री गणेश मंदिर, टिटवाळा परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आला. यामध्ये पर्यावरण विषयक घोषणा, पर्यावरण गीते सादर करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे हे नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेळी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी *बीट प्लास्टिक पोलुशन* या संदर्भात नागरिकांना अवगत केले. तसेच स्वच्छताप्रेमी नागरिक विनय तटके यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम विषद केले.
या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आपल्या भाषणात ओला-सुका कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकचा वापर आणि परिसर स्वच्छता या संदर्भात जनसमुदायाला मार्गदर्शन करताना उपस्थित सर्व फेरीवाले, दुकानदार, फुलवाले यांना व्यक्तिशः कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक बंदी यासंदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डोंबिवलीतील विवेकानंद सेवा मंडळाचे अनिल मोकल यांनी उपस्थित नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. याचप्रमाणे पर्यावरणविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन आज डोंबिवली पश्चिम येथील आनंदनगर उद्यान, डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौक, पाथर्ली येथील शेलार चौक, त्याचप्रमाणे कल्याण मधील वसंत व्हॅली, प्रबोधनकार ठाकरे सरोवर, कल्याण स्टेशन परिसर येथे आज संपन्न झाले.
यावेळी उपायुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव तथा मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॉ. प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, उप अभियंता मुराई, सहाय्यक आयुक्त सविता हिले, राजेश सावंत, उपमुख्य स्वच्छता अधिकारी ए. एल. घुटे, देगलूरकर, महापालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच विविध एनजीओजचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, श्री लक्ष्मीनारायण संस्था आणि विवेकानंद सेवा मंडळ डोंबिवली, सोलेस इंडिया या संस्थांच्या आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग, उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



