Views: 623
कल्याण : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून डॉ. सोमनाथ बाभळे यांनी रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली शाळेतील इयत्ता १ ली ते १० वी मधील १५० विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेन्सिल सेट, पेन पट्टी या शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले.
शाळेमध्ये गुरुपौर्णिमा ही मोठ्या भक्तिभावाने व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. शाळेतील कला शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख लता कोळी यांनी पुढाकार घेऊन डॉ.सोमनाथ बाभळे यांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आवाहन केले होते. महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेत गुरुपौर्णिमा हा दिवस गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालापयोगी वाटप करणारा व विद्यार्थ्यांना आनंद देणारा दिवस होता. आपल्या पाल्याला मिळालेल्या शालापयोगी वस्तू पाहून पालकांना खुप आनंद झाला. डॉ. सोमनाथ बाभळे हे कल्याणमधील प्रथितयश डॉक्टर असून सामाजिक जाणिवेतून ते नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत असतात.
या कार्यक्रमाप्रसंगी डोंबिवली मधील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व शाळेचे माजी विद्यार्थी विश्वास भोईर, रेल चाईल्ड संस्थेचे अध्यक्ष नितीन दिघे, कार्यवाह भगवान सुरवाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर चौधरी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अजयकुमार जोगी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोरसे, सरस्वती मंदिर माध्यमिक कल्याण शाळेचे मुख्याध्यापक जयराम पाटील व माजी मुख्याध्यापक अंकुर आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणतज्ञ विश्वास भोईर यांनी व्यास पौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना अत्यंत ओघवत्या भाषेतून समजावून दिले. रेल चाईल्ड संस्था अध्यक्ष नितीन दिघे यांनी सुरेख पद्धतीने गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून दिले आणि उत्तम यश संपादन करून आई,वडील व शिक्षकांना आनंद घ्यावा असे आवाहन केले. तसेच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक कार्यवाह भगवान सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीरूपाने गुरुपौर्णिमेचे महत्व समजावुन दिले. शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिका प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले.



