Views: 513
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकासाचा मुख्य गाभा असलेला रिंग रोडमुळे महानगरपालिकेचा चौफेर विकास होणार असून त्या माध्यमातून महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देखील होणार आहे. त्यामुळे रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणान्वये मोबदला देण्याची मागणी गोरखनाथ म्हात्रे या शेतकऱ्याने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणा नुसार प्रत्येक रस्त्याला बाधित शेतकऱ्याला बाजार भावाच्या दुप्पट मोबदला पैशाच्या स्वरूपात देण्यात यावा. रिंग रूटला बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीसाठी राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात. रिंग रूटला बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांची जागा बाधित झाल्याचे प्रकल्पग्रस्थ प्रमाणपत्र देण्यात यावे. रिंग रूट पूर्ण झाल्यास त्या रिंग रूट वर जाण्या-येण्या साठी भविष्यात टोल आकारणी झाल्यास त्यावर बाधित भूमिपुत्रांच्या कुटुंबीयांना कायम स्वरूपी टोल भाफी मिळावी.
रिंग रूटवर जुनी घरे, गोठा किंवा इतर स्वरूपाचे बांधीव बांधकाम असल्यास त्या बांधकामाचा बाजार भावानुसार पैशाच्या स्वरूपात स्वतंत्र मोबदला देण्यात यावा. तसेच रिट पेटीशन क्र.४०२४/२०२१ ह्या दाव्या मध्ये शेतकरी नसताना देखील रोख रक्कम स्वरूपाचा मोबदला दिलेला आहे, त्यामुळे त्या निकालाचा आदर करून, सर्व शेतकऱ्यांना ह. वि. ह. (टिडीआर) स्वरूपाचा मोबदला न देता इतर सर्व शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा दुप्पट रोखीने मोबदला देण्यात यावा. जर महानगर पालिका ह.वि.ह. (टीडीआर) देणार असेल तर शेतकऱ्यांच्या जागेचे सरकारी धोरणानुसार किती मूल्य होत ते लेखी कळवावे तसेच ते मूल्य शेतकऱ्यांना कसे मिळेल आणि ते कोण देईल त्याची हमी द्यावी.
तरी या मागण्यांचा विचार करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गोरखनाथ म्हात्रे या बाधित शेतकऱ्याने केली असून याबाबत महानगरपालिकेच्या स्तरावर कार्यवाही करण्यात आली नाही तर शेतकारी या रिंग रूट ला जागा देण्यास तयार होणार नाही व संमती देखील दर्शविणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.



