Views: 441
कल्याण : दिवाळीनिमित्त डोंबिवलीत हिंदुत्वाचे विचार घेऊन भगवामय करण्याचे कार्य सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्व. बाळसाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार या भगवातुन प्रत्येकाच्या मनात मनात कायम राहतील असा विश्वास ‘बाळासाहेबांची शिवसेना’ डोंबिवली शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्त केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त पालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी यांना दिवाळीचे फराळ, कंदील, कपडे भेट स्वरूपात देण्याचा कार्यक्रम डोंबिवली येथील लेवा भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पालिकेचे डॉक्टर देखील उपस्थितीत होते. प्रभागातील सर्व नागरिकांच्या दरवाज्यासमोर भगव्या रंगाचे कंदील लागलेले दिसावेत. कारण प्रखर हिंदुत्वाचा विचार भगव्या रंगाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पोहोचणे काळाची गरज आहे. हिंदुस्थानात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पसरले पाहिजे. आज राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात याच विचारांचे सोने नागरिकांपर्यंत पोहोचविले. डोंबिवलीत कायम भगवा फडकेल असा माझा ठाम विश्वास आहे असे राजेश मोरे यांनी सांगितले.



