Views: 476
काम लिमिटेड करताय मग पगारही लिमिटेड घ्या – शहर अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंत्याला झापले
कल्याण : ठेकेदाराकडून व्यवस्थित काम करून घेणे ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला लिमिटेड काम करायचे असेल तर मग पगारही लिमिटेड घ्या अशा शब्दांत केडीएमसीच्या शहर अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंत्याची कान उघाडणी केली. दिवाळीच्या पार्श्वभमीवर कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. त्याची नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन आहिरे यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यावेळी एका कनिष्ठ अभियंत्याशी दूरध्वनीवर रस्त्याच्या कामाबाबत बोलताना त्यांनी ही कान उघाडणी केल्याचे दिसून आले. तर येत्या तीन दिवसांत केडीएमसी क्षेत्रातील खड्डे बुजवून खड्डे मुक्त दिवाळी साजरी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यंदाचा पावसाळा कल्याण डोंबिवलीकरांसाठी भलताच तापदायक ठरत आहे. दहीहंडी उत्सवापासून मागे लागलेले खड्ड्यांचे हे दृष्टचक्र आता दिवाळी तोंडावर आली तरीही संपण्याचे नाव घेत नाहीये. नाही म्हणायला गणेशोत्सव, नवरात्रौत्सवापूर्वी आणि त्यानंतरही पालिकेकडून खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. परंतु लांबलेल्या पावसामुळे केडीएमसी प्रशासन आणि नागरिकांचा हा आनंद फार काही टिकू शकला नाही. तर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर केडीएमसी प्रशासनाने पुन्हा एकदा हे खड्डे भरण्यासाठी जोरदार कंबर कसलेली दिसत आहे.
विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीतील एकाच वेळी अनेक प्रमूख रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. पुढील तीन दिवस सलगपणे आणि तेही दिवस रात्र २४ तास हे काम सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसीचे नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. तसेच आता सुरू असणारे आणि यापूर्वी करण्यात आलेले काम हे चांगल्या दर्जाचे असून पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे सचिव आणि माहिती जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत कल्याण डोंबिवलीसाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून कल्याण डोंबिवलीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि स्वच्छ करण्याची ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत दिवाळीच्या पूर्व संध्येपर्यंत दिवस रात्र खड्डे भरण्याचे काम सुरू राहणार असून दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना दिलास देण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिली.
कल्याण डोंबिवलीकरांना लवकरच मुख्यमंत्री देणार ‘दिवाळी गिफ्ट‘ – दिपेश म्हात्रे
दरम्यान अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचे कल्याण डोंबिवलीकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठे गिफ्ट मिळणार असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. केडीएमसी प्रशासनाकडून डोंबिवलीत सुरू असणाऱ्या खड्डे भरण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दिवाळी गिफ्टबाबत सांगितले. परंतू हे गिफ्ट नेमकं काय असेल त्याविषयी मात्र त्यांनी अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले



