डोंबिवली पूर्वेतील फेरीवाल्यांना मनसे देणार दणका

Views: 592
शेअर करा:

डोंबिवली : (प्रतिनिधी) डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ, रस्ते दररोज सुमारे ५०० फेरीवाल्यांनी गजबजून गेलेले असतात. ग आणि फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाकडून फेरीवाल्यांवर कारवाईचा देखावा केला जातो. पालिका कामगारांचे फेरीवाल्यांना पाठबळ असल्यामुळे फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरातून हटत नाहीत, असा थेट आरोप मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. पालिकेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.  

     फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथक प्रमुख अरूण जगताप वर्षानुवर्ष एकाच प्रभागात काम करत आहेत. त्यांना राजकीय आशीर्वाद असल्यामुळे पथक प्रमुख जगताप यांची बदली प्रशासनाकडून केली जात नाही. जगताप यांचे फेरीवाल्यांशी घनिष्ट संबंध आहेत. प्रत्येक साहाय्यक आयुक्त पथक प्रमुख जगताप यांच्या इशाऱ्यावर फेरीवाल्यांवर देखाव्याची कारवाई करतो. जगताप यांची तातडीने कल्याण, टिटवाळा भागातील प्रभाग कार्यालयात बदली करण्याची मागणी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली जाणार आहे, असे घरत यांनी सांगितले.

     डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील नेहरू रस्ता, पाटकर रस्ता, डाॅ. राॅथ रस्ता, रामनगर वाहतूक पोलीस कार्यालय, राजाजी रस्ता, बाजीप्रभू चौक, फडके रोड सकाळी आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत फेरीवाल्यांनी गजबजलेले असतात. या रस्त्यांवरून येजा करताना रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात १५० मीटरमध्ये एकही फेरीवाला नाही, मग पूर्व भागातील फेरीवाले पालिकेचे जावई आहेत का, असा प्रश्न शहराध्यक्ष घरत यांनी केला. 

     आयुक्तांना दाखविण्यासाठी फेरीवाल्यांवर हटाव पथके देखाव्याची कारवाई करतात. छायाचित्रे पाठवून झाली की कामगार फेरीवाल्यांना रस्त्यावर बसण्याचा इशारा करतात. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून डोंबिवली पूर्व भागात सुरू आहे. फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे स्थानक भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. रेल्वेची स्वच्छतागृह, नेहरू रस्त्यावरील छत्रपती शिवाजी मंडई, उर्सेकरवाडीतील मंडई फेरीवाले सामान ठेवण्यासाठी वापरतात. पालिका, रेल्वे अधिकाऱ्यांना या जागांचा फेरीवाल्यांना गोदाम म्हणून वापर करून देऊ नका, अशी पत्रे देण्यात येणार आहेत. फेरीवाला हटाव पथकाकडून डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले हटत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन फेरीवाल्यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीतील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, रेल्वे प्रवासी यांनी मनसे कार्यालयात येऊन फेरीवाल्यांचा बंदोबस्त करा म्हणून मागणी केली आहे, असे घरत यांनी सांगितले. 

याबाबत ग, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत