Views: 514
डोंबिवली : नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव-देवीचापाड्याच्या गावदेवी लोटूआईची जत्रा येत्या शुक्रवारी आणि शनिवार असा दोन दिवस भरणार आहे. ही जत्रा दोन वर्षानंतर भरणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे.
शुक्रवारी २२ एप्रिल राजी पालखी सोहळा, तर २३ एप्रिल शनिवारी मुख्य जत्रा आणि कुस्ती सामने होणार असल्याची माहिती संस्थानातर्फे देण्यात आली. जत्रेला कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरी व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात हजारो भक्तगण येतात. त्यामुळे ही जत्रा जणू आई गावदेवीच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गावदेवी आईच्या जत्रेला खंड पडला होता. सरकारने निर्बंध शिथिल के यंदा गावदेवीची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेला दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून आयोजकांनी भाविकांची योग्य व्यवस्था केली आहे. दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य रोषणाई, देवीच्या मुखवट्यासह गाभाऱ्याची सुबक सजावट करण्यात आली होती. देवीला सुंदर दागिन्यांचा शृंगार करण्यात आला. शनिवारी दुपारी देवीचापाडा रोड, चकाचक मंदिरासमोरील पटांगणात कुस्तीचे जंगी सामने होणार आहेत. त्यासाठी कुस्तीपटूनी गावदेवी मंदिर संस्थानाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रोख बक्षिसे दिली जातील, असे सांगण्यात आले. देवीचापाडा परिसरात अबाल-वृद्धांसाठी मनोरंजन आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
संस्थानाचे सर्व पदाधिकारी त्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले. अत्यंत उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात ही जत्रा होणार आहे. तसेच मंदीर परीसरात ठीकठीकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जत्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणे, जादूचे खेळ, खाऊची दुकाने, खेळणी, आदी मनोरंजनाची साधनेही उपलब्ध होणार आहेत



