Views: 553
निलम चौधरी
कल्याण : कल्याणच्या ऐतिहासिक काळा तलाव (भगवा तलाव) सुशोभीकरणाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पातून सुरु आहे. मात्र या तलावाच्या परिसरात सकाळी आणि संध्यकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या तसेच उद्यानात विरंगुळ्यसाठी येणाऱ्या नागरिकाची संख्या मोठी असल्याने कामात अडथळा येत आहे. यामुळेच काम वेगाने पूर्ण करण्यासाठी काळा तलाव परिसरात नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. १ नोव्हेबर ते ७ डिसेंबर पर्यत काळा तलाव परिसरात नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचे पोस्टर प्रवेश द्वारावर लावत प्रवेशद्वार कुलूप बंद करण्यात आले आहे.
कल्याण शहरात तलावांची संख्या मोठी आहे. काही तलाव आजच्या घडीला जिवंत आहेत तर काही मृत अवस्थेत आहेत. कल्याणच्या या काळा तलावाला विशेष महत्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील स्व. प्रबोधनकार ठाकरे यांचे काही काळासाठी या तलावाच्या परिसरात वास्तव्यास असल्याचे जाणकार सांगतात. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे काळा तलाववर विशेष प्रेम होते. त्यांची आठवण महणून येथील तलाव परिसरात बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
स्मराकासह तलावाच्या परिसरात ओपन जिमचे उपकरणे, बसण्यासाठी जागा, लहानमुलांसाठी खेळण्यासाठी विविध खेळाचे साहित्य याठिकाणी उभारण्यात आले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकासाठी काळा तलाव हे विरंगुळयाचे आणि व्यायामाचे ठिकाण बनले आहे. या काळा तलावात सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून तरंगते हॉटेल उभारण्यासह विविध कामे केली जात आहेत. मागील वर्षभरापासून काळा तलाव परिसरात काम सुरु असले तरी ते वेळेत पूर्ण करणे शक्य होत नाही. अनेक अडथळे येत होते. त्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तलाव परिसरात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.



