Views: 601
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने बारावे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पावर कचऱ्याचे ढीग साचून परिसरातील नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधींचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथे साचलेले कचऱ्याचे ढीग लवकरात लवकर हटवावे अन्यथा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद पाडू असा इशारा मनसेने दिला आहे. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आणि मनसेचे बारावे गोदरेज हिल प्रभाग अध्यक्ष सुनील घेगडे यांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
बारावे कचरा प्रक्रिया प्रकल्प येथे टाकत असलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांना रोज दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्यांना आपल्या फ्लॅटच्या खिडक्या उघड्या ठेऊन रहाणे मुश्किल झाले आहे. एवढेच नाही तर खिडक्या बंद करून देखील हा दुर्गंधीचा त्रास कमी होत नाही आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. याआधी २०१८ व २०१९ साली महापालिकेवर ह्या प्रकल्पाविरोधात मोर्चे काढले होते. त्यावेळी येथील नागरिकांना खात्री देण्यात आली होती कि प्रकल्पामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. परंतु नागरिकांना ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट आज झाली आहे बारावे प्रकल्पाच्या इथे कचऱ्याचे ढिगच ढिग लागले आहेत.
येथील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर भरत आहेत, महापालिकेकडून त्यांना हा मोबदला भेटणार असेल तर येथील सर्व नागरिक इथून पुढे महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा कर भरणार नाहीत. “सुख सुविधा नाहीत तर कर नाही” अशी भूमिका येथील नागरिकांची असेल. त्यामुळे हा बारावे प्रकल्प व्यवस्थित नियमांचे पालन करून चालवावा अन्यथा पूर्णतः बंद करावा. त्वरित येथील सर्व ढिगारे उचलावेत व त्यावर योग्य ती प्रक्रियाकरून येथून हलवावेत जेणे करून येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. अन्यथा हा बारावे प्रकल्प आमच्या पद्धतीने बंद पाडू असा इशारा मनसेच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.



