Views: 462
सोनारपाडा गावातील शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे मागणी
कल्याण : सोनारपाडा गावातील शेतकऱ्यांची जमीन परस्पर विक्री प्रकरणाची इडी चौकशी करून संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. अनुराग ठाकूर आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात नेवाळी गाव येथे आले असता शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्याकडे मांडली. तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रसरकार कडून पाठपुरावा करण्यासाठी जातीने लक्ष घालेन असे आश्वासन अनुराग ठाकूर यांनी शेतकऱ्यांना दिले.
कल्याण तालुक्यातील सोनारपाडा गावातील शेतकऱ्यांनी कसत असलेल्या जमीनीची परस्पर विक्री करणाऱ्या मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापक वेणू धुत व राम दुबे यांनी संगनमताने आपल्या स्वार्थापोटी संरक्षीत कुळांसहीत जमीन विक्री करण्यासाठी तत्कालीन धर्मदाय आयुक्त जे. डी. देशमुख यांच्याशी आर्थीक व्यवहार करून संरक्षित कुळांच्या जमिनी कुळांसहीत विक्री करताना प्रती एकर ४० लाख रुपये भाव असताना धर्मदाय आयुक्त व मुंबई गोग्रस भिक्षा सोसायटी यांनी प्रती एकरी ६ लाख ६० हजार रुपयांमध्ये मे.आशर रियलटोर्सचे भागीदार अजय आशर व जतीन दैसरया यांना विक्री केली.
मुंबई गोग्रस भिक्षा सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापक बिल्डर व सरकारी अधिकारी काही राजकीय पुढारी मिळुन सुमारे ५०० कोटी रूपयांचा आर्थीक घोटाळा केला आहे. या प्रकरणाची सक्त वसुली संचालनालयकडून (इडी) सखोल चौकशी करून संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना नेवाळी येथे निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संरक्षित कुळांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी केली.
याप्रकरणाचा मी स्वतः केंद्रसरकार कडून पाठपुरावा करण्यासाठी जातीने लक्ष घालेन असे आश्वासन अनुराग ठाकूर यांनी शेतकऱ्यांना दिले असल्याची माहिती शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे सरचिटणीस जितेंद्र ठाकुर यांनी दिली.



