Views: 565
कल्याण : शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी केवळ एक दिवस योग दिनाचे पालन न करता योगाभ्यास हा दैनंदिन दिनचर्येत अंगिकारावा, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले. १५ जून ते २१ जून दरम्यान महानगरपालिकेमार्फत संपन्न होणा-या योग सप्ताहाचा सांगता समारोह, जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज वै. ह.भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडागृहात झाला, त्यावेळी बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी हे प्रतिपादन केले.
योगामुळे दिवसभर आपल्यात उत्साह संचारतो आणि आपण नविनतम कामे, आव्हाने स्विकारण्यास उद्युक्त होतो असे म्हणत त्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपआयुक्त अतुल पाटील, उपआयुक्त धैर्यशील जाधव, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे – कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहा. आयुक्त स्नेहा करपे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
योग दिनाचे औचित्य साधुन सुमारे 600 शालेय विद्यार्थ्यांनी तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी वर्गाने देखील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडा गृहात योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. याचवेळी महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील हजारो शालेय विद्यार्थ्यांनी देखील आपापल्या शाळेमध्ये गुगल मिट द्वारे योगासने करत योग दिन साजरा केला. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात देखील आरोग्य कर्मचा-यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, योग दिनी योगासनांचे प्रात्यक्षिक करत निरोगी आरोग्याचा संदेश जनमानसांपर्यत पोहचविला.



