Views: 495
कल्याण : प्रतिष्ठेचा संगीत महोत्सव म्हणून देशभरात नावाजलेल्या “कल्याण गायन समाज” आयोजित एकविसाव्या “देवगंधर्व महोत्सवाला” आज सुरवात झाली. १० व ११ डिसेंबर असे दोन दिवस हा संगीत सोहळा रंगणार आहे.
“स्टेट बॅंक ऑफ इंडिया” यांचे प्रायोजिकत्व लाभलेल्या या वर्षीच्या महोत्सवाचे ऊद्घाटन महोत्सवाचे यंदाचे अध्यक्ष, के. इ. एम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता, विख्यात डॉ. अविनाश सुपे, उपाध्यक्ष सचिन शेटे, गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चीफ मॅनेजर देवोजीत गोस्वामी तसेच गायन समाजाचे पदाधिकारी या सर्वांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
महोत्सवाच्या पहिल्या सत्राचा श्रीगणेशा प्रथितयश गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. सुरवातीला राग “श्री” मधील “बाजो गजरवा” ही तिलवाडा तालातील व “सांझ भयी” ही द्रुत एक तालातील चीज सादर झाली. त्यानंतर त्यांनी राग “भूप” मधील “जब से तुम्हीसन लागे” ही अध्धा त्रितालातील रचना व मिश्र खमाज मधली “कौन गली गयो शाम” ही ठुमरी सादर करून आपल्या मैफिकीची सांगता गेली. मंजुषा यांना हार्मोनियम साथ अनंत जोशी व तबला साथ प्रशांत पांडव यांनी केली. तर रसिका वैशंपायन, तनिष्क अरोरा यांनी तानपुऱ्यावर सुरेल साथ दिली.



