Views: 469
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक मोहन उगले यांचे नाव पालिकेकडून प्राप्त झालेल्या नवीन मतदार यादीत नसल्याचे निवडणूक विभागाच्या मतदार यादीचा सावाळा गोंधळ समोर आला आहे. विशेष म्हणजे याआधी सध्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांचे भाऊ, मुलगा यांचे नाव देखील वगळण्यासाठी ऑनलाईन अर्ज आल्याचा गौप्यस्पोट निवडणूक अधिकारी वर्षा थळकर यांनी केला.
मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. याच पार्शवभूमीवर मतदार याद्यामधील नाव नोंदणीसाठी माजी नगरसेवक उगले यांनी त्यांच्या प्रभागातील मतदारांना आवाहन केले होते. मतदार यादीची पाहत करत असताना उगले यांचेच नाव मतदार यादीतून नाव गायब झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरवातीला लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या वेळी माजी नगरसेवक उगले मतदार यादीत यांचे नाव होते. आता प्राप्त झालेल्या यादीतून नाव वगळण्यात आल्याने त्यांनी निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन यादीतून नाव कसे काय गायब झाले असा सवाल उपस्थित करीत अंतिम यादीत पुन्हा नाव समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक, मोहन उगले, सुनील वायले, विघाधर भोईर, अनंता पगार, धर्मेंद्र सिंग, बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेविका छायाताई वाघमारे, महिला आघाडी शिवसेना कल्याण शहर नेत्रा उगले, माजी नगरसेविका शालिनी वायले, कल्पना जमदाडे, सुरेखा दिघे, यामिनी ढोकिया, एरगुडे आदी उपस्थित होते.
मतदार याद्याच्या सावळा गोंधळाबाबत माजी नगरसेवक मोहन उगले यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, मतदार याद्या चाळत असताना माझे नाव मतदार यादीत नसल्याचे लक्षात आले. गेली दोन वेळा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. निवडणूक लढण्या आधीच नामोहरम करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक लढवू नये म्हणून हा प्रकार सुरु आहे, हि शोकांतिका आहे, हा सर्व प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले आणि पुन्हा मतदार यादीत समाविष्ठ करण्यात यावे याबाबत निवेदन दिले. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी उगले यांनी केली आहे. निवडणूक अधिकारी थळकर यांनी उगले यांचे नाव समाविष्ट केले जाईल असे आश्वासन दिले आहे.
कल्याण पश्चिमचे आमदारांचे नावही वगळले
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांचे भाऊ आणि मुलाचे नाव मतदार यादीतून काढण्यासाठी कोणीतरी निवडणूक अधिकारी वर्गाकडे अर्ज केला होता. या अर्जाविषयी संशय आल्याने अधिकारी वर्गाने थेट आमदारांशी संपर्क साधला. त्यावेळी अशा प्रकारे नाव वगळण्याचा अर्ज आमच्याकडून केला गेला नसल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली. असे काही अर्ज ८ अंतर्गत नाव स्थलांतराचे आमच्याकडे आले होते. यात आमदारांचा अर्ज असल्याने ते लक्षात आले आणि तात्काळ त्यात बदल करून घेण्यात आला असल्याचे निवडणूक नायब तहसीलदार वर्षा थळकर यांनी सांगितले.
एकूण वगळलेली नावे
कल्याण डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण १६ लाख ४९ हजार २७० मतदर आहेत. कल्याण पश्चिमेत १ लाख २२ हजार, कल्याण पूर्वेत ९२ हजार १९२, कल्याण ग्रामीणमध्ये ८२ हजार ३६४ आणि डोंबिवलीत १ लाख १७ हजार ९२ मतदार अशा एकूण ४ लाख १३ हजार मतदारांची यादीत छायाचित्रे नसल्याचे समोर आले होते. त्यापैकी १ लाख ६७ हजार ९०९ मतदारांची नावे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याने वगळण्यात आली होती. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून आजमितीला १ लाख २२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.



