Views: 518
कल्याण : हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादनांची विक्री यांतून आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा होत असल्याचे समोर येत असल्यामुळे ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ ला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. मुंबई येथील इस्लामिक जिमखाना, मरीन लाईन्स येथे 12 आणि 13 नोव्हेंबर या दिवशी होणारा हा कार्यक्रम रहित करण्याच्या मागणीसाठी कल्याण (प) रेल्वे स्थानकाजवळ हलाल सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. पोलीस आणि शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? असा प्रश्न यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधीकडून उपस्थित करण्यात आला तसेच भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 80 टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, असे या आंदोलनाच्या वेळी स्पष्ट करण्यात आले.
गेल्या काही काळापासून भारतात हेतुतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्याची ‘जमियत – उलेमा-ए-हिंद’ यांसारख्या संस्थांकडून सक्ती केली जात आहे. याच हलाल उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्लॉसम इंडिया’ या संस्थेने हा ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ आयोजित केला आहे. दादर, घाटकोपर आणि धारावी या ठिकाणी हलाल सक्ती विरोधी कृती समितीने बैठका घेऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस आयुक्त यांना निवेदन, आंदोलने, भव्य मोर्चा, सोशल मिडियाद्वारे जनप्रबोधन आदी माध्यमांद्वारे या ‘इंटरनॅशनल हलाल शो’ ला जोरदार विरोध करण्याचा निर्धार केला आहे.
कल्याण येथे झालेल्या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे कल्याण पूर्व येथील धर्मप्रचारक अधिवक्ता शिवानंद पांडे, श्री रामप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनिल जयस्वाल, भारत विकास परिषदेच्या नीरजा मिश्रा, कल्याण येथील भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, जेष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर, अधिवक्ता सर्वेश यादव, अधिवक्ता प्रियेश सिंग, डॉ. किशोर जैन, येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते, कल्याण येथील सदगुरु श्री स्वामी समर्थ मठ, श्री राम हिंदू सेना, हनुमान मित्र मंडळ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संस्थां हालाल सक्ती विरोधी कृती समितीच्या माध्यमातून एकत्र आल्या होत्या.



