Views: 595
कल्याण : आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा शालेय विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे उदगार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी काढले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिरात गुरुवारी संपन्न झालेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या समयी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास हा प्रामुख्याने शिक्षकांमुळेच होतो असाही त्यांनी उल्लेख केला.
पारितोषिक वितरण सोहळ्यात मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे, उपायुक्त अर्चना दिवे, वंदना गुळवे, धैर्यशील जाधव, विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, इंद्रायणी करचे, सहाय्यक आयुक्त क प्रभाग तुषार सोनवणे, क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत, संतोष पाटील, नंदनवार, अजय पाखरे आणि इतर अधिकारी व कर्मचारी तसेच खेळाडू क्रीडा शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतर शालेय जिल्हास्तरीय अशा एकूण ९१ प्रकारच्या क्रीडा स्पर्धां पैकी ४९ अनुदानित व ४२ विनाअनुदानित क्रीडा स्पर्धांचे आयोजन २८ ऑक्टोबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत करण्यात आले होते.
जिल्हा स्तरीय स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने ४३ हजार विद्यार्थांची नोंदणी झाली. स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त ३७७५ विद्याथ्यांना प्रोत्साहनात्मक मेडल आणि ट्रॉफी देण्यात आली आहे. यांची एकूण ४९ खेळातून निवड करण्यात आली आहे. ४४१ विभाग स्थरावरून आणि राज्य स्थरावर ११२ खेळाडू निवडले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात आपल्या शहरातून निवडले गेले आहे, हे कल्याण डोंबिवली शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे क्रीडा नोडल ऑफिसर तथा सहाय्यक आयुक्त स्नेह करपे यांनी सांगितले. तसेच क्रीडा क्षेत्रात आपले आपल्या शहराचे नाव उज्जवल आहे असाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आकार जिम्नॅस्टिक्स या संस्थेच्या लहानग्या मुलांनी जिम्नॅस्टिक मधील काही कसरती लिलया करून उपस्थित प्रेक्षकांना अचंबित केले. यावेळी महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील विद्यार्थी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.



