Views: 678
कल्याण : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कृत्याचा कल्याणतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आणि पानाच्या पिचकाऱ्या मारत आंदोलन करीत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, महिला शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख मोहन उगले, माजी नगरसेवक जयवंत भोईर, गणेश जाधव, माजी परिवहन सदस्य सुनील खारुक, युवा सेना शहर प्रमुख सुजित रोकडे, अनिरुद्ध पाटील, शाखा प्रमुख चेतन म्हामुणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत अजून एका वादात सापडले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच संजय राऊत वार्ताहराच्या माईकसमोर थुंकले तर शुक्रवारी दुसऱ्यांदा एका पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारताच राऊत यांनी पुन्हा सलग तीच कृती केली. त्यामुळे राऊत यांची ही कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात मुंबईतील एक कुटुंब उन्हाळ्यात गारव्यासाठी परदेशात जात असते, अशी टिका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी पुन्हा त्या प्रश्नावर थुंकण्याचा प्रकार केला.
या प्रकरणाचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध संजय राऊत यांच्या बँनरला जोडे मारत, पानाच्या पिचकाऱ्या मारत निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी बाळासाहेबाची शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवि पाटील यांनी संजय राऊत हे विकृत प्रवृत्तीचे व्यक्तीमत्व असून त्यांच्या सकाळच्या भोंगा प्रकरणाला महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. शिवसेना संपावयाची यांनी सुपारी घेतली असून त्यांचे बेताल वक्तव्य थांबण्यासाठी मानस उपचार तज्ञाकडे त्यांना दाखविले पाहिजे असा टोला त्यांनी लागवला.


