Views: 566
कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर गावातील साईशरणम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील बाजूला बांधण्यात येत असलेला स्मशानभूमीस २५० कुटुंबीयांचा तीव्र विरोध आहे. हा परिसर नागरी वस्तीचा व रहदारीचा असून त्या पासून निर्माण होणाऱ्या समस्यांची माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व स्मशानभूमी दुसरी कडे नेण्यात यावी व त्याजागी मुलांसाठी खेळण्याचे मैदान तयार करावे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले. यावेळी समीर अंबुर्ले, अनील आंधळे, गणपत गरकल, स्मिता जाधव, विद्या पानसरे, रवी शींदे, राहुल मोरे आदी. सोसायटी मधील सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईशरणम सोसायटीमध्ये ए, ए१ व बि विंग मिळून एकूण २५० कुटुंबे वास्तव्य करत आहेत. या सोसायटीच्या पश्चिमेस अगदी सोसायटीच्या भिंतीलगत अंदाजे ५० मीटर अंतरावर स्मशानभूमीचे अंदाजे ३३ गुंठे क्षेत्रामध्ये बांधकाम चालू आहे. तसेच सोसायटीच्या दक्षिणेस आधीपासूनच अंदाजे १५० मीटर अंतरावर एक स्मशानभूमी पूर्वीपासून अंदाजे २० ते ३० वर्षापासून अस्तित्वात आहे. सोसायटीच्या शेजारील पश्चिमेस नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीमुळे सोसायटीच्या २५० कुटुंबीयांना त्याचा त्रास होणार आहे.
या विषयांकित तक्रारी अर्ज यापूर्वीही पालिका आयुक्तांना देण्यात आलेला असून याबाबत पालिकेकडून कोणतेही प्रतिउत्तर देण्यात आलेले नाही. या सोसायटीमधील सर्व स्थानिक कुटुंबवासी, रहिवासी सोसायटीच्या शेजारी नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीस तीव्र विरोध करत आहोत. तरी केडीएमसीने साई शरणम मधील २५० स्थानिक कुटुंबीयांची मागणी लक्षात घेता सोसायटीच्या लगत नव्याने बांधण्यात येत असणाऱ्या स्मशानभूमीचे बांधकाम थांबवावे व पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन सोसायटीला व इतरांनाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी स्मशानभूमी बांधावी अशी मागणी सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.



