Views: 469
बालक मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला अभूतपूर्व दीपोत्सव
कल्याण : कल्याण मधील बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जपत दीप अमावस्या निमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात बालक मंदिर संस्थेच्या सभागृहातील प्रांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी बालक मंदिर संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून आणलेल्या विविध आकाराच्या व बहुरंगी पणत्या व दिव्यांची भव्य दिव्य अशी आरास करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन व्यवस्थापन व मार्गदर्शक सर्वोत्तम केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडा पिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसह दिव्यांचे मनोभावे पूजन करण्यात आले. दिव्यांची आरास केल्यानंतर शाळेच्या सर्व विद्यार्थी व पालकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिव्यांची आरास पाहिली. याप्रसंगी बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील जवळपास ४०० व पूर्व प्राथमिक शाळेतील १०० अशा एकूण ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा चौधरी व पाहुण्यांची ओळख व पाहुण्यांची ओळख मंगेश घाटे यांनी केली. बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेच्या सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास संस्थेचे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार व पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या. जोशी, कॅ. र. मा. ओक हायस्कूलच्या मुख्याधायपिका माळी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या संस्कृतीमध्ये आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मोठे महत्व असून ही अमावस्या आपल्याकडे दिप अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांत लोकांच्या मानसिकतेत झालेले बदल होऊन हा दिवस दिप अमावस्येऐवजी ‘गटारी’ नावाने कुप्रसिद्ध झाला आहे. जणू काही एखादा राष्ट्रीय सण असावा अशा दृष्टीने लोकं त्याकडे पाहू लागले आहेत. परंतू समाजातील हेच नकारात्मक विचार पुसून आपली मूळ संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी बालक मंदिर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दिप पूजनाचा हा स्तुत्य उपक्रम राबवत असल्याची माहिती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांनी दिली.



