Views: 546
कल्याण : कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व
महोत्सवाच्या पहिल्या सत्राचा श्रीगणेशा प्रथितयश गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. दुसऱ्या सत्रात आघाडीचे तबलावादक पं विजय घाटे यांच्या कल्पनेतून साकार झालेला मेलोडीक रिदम हा कार्यक्रम सादर झाला. सुर आणि ताल यांचा संगम रसिकांना किती मंत्रमुग्ध करू शकतो याची प्रचीती जवळजवळ दीड तास रंगलेल्या या सत्रात रसिकांना आली.
संपूर्णपणे अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित अशा या कार्यक्रमाची सुरवात राग बागेश्रीतील त्रितालातील सरस्वतीवंदनेने झाली. सतारीवर आलाप, जोड, झाला यांचा आस्वाद व नंतर कथक मधील आमद, परण, विविध तुकडे यांचा रसिकांनी आनंद लुटला.
गायन (सुरंजन खंडाळकर), सतार (उस्ताद शाकीर खान), कथक नृत्य (शीतल कोलवलकर) या सगळ्यांना आपल्या तालावर खेळवत पं विजय घाटे यांनी रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवले. हार्मोनियमवर अभिषेक शिनकर यांनी उत्तम साथ दिली. सागर पटोकार यांनी पढंत केली.
मिश्र किरवाणी मधील “तोरे बिना मोहें चैन नाही, ब्रिज के नंदलाला” ही ठुमरी पेश करून त्यांनी आपला कार्यक्रम संपवला.
पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र गाजवले विख्यात गायक “आनंदगंधर्व” श्री आनंद भाटे यांनी. आपल्या नावाप्रमाणेच रसिकांना आपल्या गायकीने त्यांनी “आनंद” यात्री बनवलं. या आनंदयात्रेची सुरवात भाटे यांनी केली राग पुरीया-कल्याणने. “आज सोवन” या विलंबित एकतालातील बंदीश आणि नंतर द्रुत तीनतालातील “बहुत दिन बिते” ही चीज संपन्न झाली. यानंतर राग बसंत मधील “पगवा ब्रीज देखन को” आणि “गली गली” या अनुक्रमे द्रुत त्रिताल आणि द्रुत एकतालातील दोन चिजा त्यांनी ऐकवल्या. “का करू सजनी” ही ठुमरी व त्यानंतर “जो भजे हरी को सदा” ह्या भैरवीतील भजनाने मैफिलीची सांगता होत असताना रसिकांची भावावस्था जणू “आनंदाचे डोही आनंद तरंग” अशीच झाली होती.
निखिल फाटक व आदित्य ओक यांनी अनुक्रमे तबला व संवादिनी यांची साथ केली. तानपुऱ्यावर प्रतीक फणसे आणि श्वेता पुराणिक यांनी साथ दिली. एका आनंदानुभवाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला.



