Views: 452
कल्याण : प्रवाशांना आता ठाणे ते डोंबिवलीचा प्रवास फक्त २० मिनिटांत होणार असून मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA)द्वारा चालू केलेल्या मोठागांव-माणकोली खाडी पूलाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होऊन हा पूल आणि रस्ता मे २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. आज या कामाची शिवसेना पदाधिकारी तथा माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला.
प्रवाशांना ठाण्यावरून डोंबिवलीला पोहचायला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो आणि मुंबई-नाशिक महामार्गावरून डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमधून जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने सिक्स लेन माणकोली पूल उल्हास खाडीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. माणकोली-मोठागांव लिंक रोड १.३ किमी लांबीचा आहे. गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीए या प्रकल्पावर काम करत असून महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी मंगळवारी प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
तर शिवसेना युवा सेना नेते दिपेश म्हात्रे यांनी आज मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, डोंबिवली पश्चिमेत मोठी डेव्हलमेंट होत आहे. आम्ही जी विकास कामे करतो ती टेक्नीकली साऊंड असतात. पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी होते. त्याठिकाणी डेव्हलमेंट झाली. त्यानंतर पुलाचे काम सुरु झाले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी १८ कोटी, मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याकरीता ५७० कोटीची निविदा एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केली आहे. रेल्वे फाटकाच्या पुलाचे काम सुरु झाले आहे. खासदारांमुळे विकास कामे मार्गी लागत आहेत. मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाचे काम ८४ टक्के झाले असून या पूलाच्या कामाचा एक्सपान्शन जॉईन करणे हा शेवटचा टप्पा आहे. या कामाची पाहणी खासदार डॉ. शिंदे हे करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.



