Views: 487
कल्याण : बालदिनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांत कार्यक्रम पार पडत असतात. सामान्य बालकांसाठी हा दिवस म्हणजे विविध उपक्रमांची रेलचेल असते. मात्र अश्यावेळी दिव्यांग बालकांना मात्र तो आनंद उपभोगता येत नाही. त्यांच्या मनातील हीच खंत ओळखून बालदिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदा तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन कर्णबधिर मूकबधिर मुलांसाठी करण्यात आले. अल्पावधीत विविध कल्पक उपक्रमांच्या माध्यमातून साहित्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या साहित्यसंपदाचा चौथा वर्धापनदिन डोंबिवली येथील संवाद प्रबोधिनी संचालित संवाद कर्णबधिर प्रबोधिनी येथील कर्णबधिर, मूकबधिर मुलांसमवेत साजरा करण्यात आला.
जेष्ठ गझलकार ए के शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जेष्ठ कवी. लेखक, गीतकार मराठी साहित्य मंडळ अध्यक्ष राजन लाखे, साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी, ज्ञानामृत शिक्षण संस्थेचे संस्थापक किसन वराडे, अपर्णा आगाशे अध्यक्षा संवाद प्रबोधिनी आणि रायगडभूषण प्राप्त कवी स्तंभलेखक रमेश धनावडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध भागातील साहित्यिकांनी आपल्या साहित्याचे सादरीकरण करून मुलांना मराठी साहित्याची ओळख करून दिली.
आपल्या निष्काम सेवेतून तळागाळातील मुलांमध्ये सद्विचारांचे बीज रोवणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सुद्धा पार पार पडला. रायगड मधील शाम रघुनाथ जोगळेकर ह्यांना निवृत्ती नंतरही शैक्षणिक आणि साहित्य सेवेसाठी “शिक्षक रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यरत शिक्षकांचाही गौरव पार पडला ह्या अंतर्गत ठाणे विभागातील विशेष कार्यासाठी हेमंत नेहते, अस्मिता सावंत, राजेंद्र झोपे, मुंबई विभागातील कार्यासाठी मानसी नेवगी आणि नाशिक विभागातील कार्यासाठी वसंत पैठणकर, अकोला विभागातील कार्यासाठी अर्चना कुलकर्णी, प्रा. डॉ अनघा सोनखासकर, अंबाजोगाई विभागातील कार्यासाठी अर्चना कुलकर्णी, पुणे विभागातील विठ्ठल सोडनवर ह्यांचा सन्मान “शिक्षक रत्न” पुरस्काराने करण्यात आले. कर्णबधिर मूकबधिर मुलांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संवादप्रबोधिनी संस्थेमधील शिक्षकांचा सन्मान सुद्धा सन्मानपत्र देऊन करण्यात आला आहे. संवाद प्रबोधिनी प्रमुख अपर्णा आगाशे ह्यांना शैक्षणिक आणि सामाजिक सेवेसाठी “समाज संजीवनी” पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
दिव्यांग मुलांसाठी “काव्यचित्र” या विशेष अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. मुलांना काही निवडक बालकविता देण्यात आलेल्या, त्यांनी आपल्याला आवडलेल्या कवितेला चित्र स्वरूपात मांडणे अपेक्षित होते. मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठी साहित्यात रुची निर्माण व्हावी आणि काव्यचित्राच्या माध्यमातून त्यांना साहित्य आणि कला ह्यांची सांगड घालता यावी या हेतूने स्पर्धा आयोजित केली गेली. सदर काव्यचित्रांचे प्रदर्शन भरविले गेले. मुलांच्या सृजनशीलतेचे कौतुक अध्यक्षीय भाषणात ए. के. शेख ह्यांनी केले.
द्वितीय सत्रात मुलांना किरण बोरकर लिखित “गोष्टी तुमच्या आमच्या” कथासंग्रहातील निवडक कथा सुनीता चिंदरकर ह्यांच्या मदतीने सांकेतिक भाषेतून सांगण्यात आल्या. सदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा बालदिनाच्या पूर्वसंध्येला मुलांना अनुभवता आला. राजेंद्र परब अध्यक्ष स्टार्ट गिविंग फाउंडेशन ह्यांनी किरण बोरकर ह्यांना शुभेच्छा दिल्या. मनोमय मीडिया ह्यांनी डिजिटल पार्टनर म्हणून काम पहिले. साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन सुद्धा उपस्थितांना बघता आले. खरेदी पुस्तकांच्या विक्रीतील रक्कम विकलांग मुलांच्या भविष्यसाठी देण्यात आली. कार्यक्रमाची समाप्ती नूतन ज्ञान मंदिर कल्याण येथील मुलांच्या पथनाट्याने झाली. कथा कविता नाटक अश्या साहित्यच्या अंगाने नटलेला साहित्यसंपदाचा चतुर्थ वर्धापनदिन सोहळा साहित्य विश्वाची गोडी निर्माण करणारा उपक्रम म्हणून मुलांना प्रेरणादायी ठरेल असे मत सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे



